साहित्य प्रतिभा

साहित्य प्रतिभा
साहित्य

Monday, 19 December 2016

तुज आहे तुजपाशी... प्रा.विजय लोहार, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव. ९१५८०८२१२८ होते पूर्वी बोलके चेहरे || कोठे गेले साजरे चेहरे || उत्सव येथे मंद जाहले, कोणी मागे सारले चेहरे || आता झाला सारथी तोकडा, आव्हानांनी वाकले चेहरे || तारुण्याचा अविरल प्रवाह कोठे आटला असा आजचा सरळ प्रश्न आहे. तरुणांमध्ये जगाच्या इतिहासाला कलाटणी देवू पाहणारे स्वप्न होते ते कोठे विरले ? आजचा तरुण क्षणोक्षण बदलत असणाऱ्या आव्हानांशी लढण्यास किती व कसा सज्ज आहे हाही सांशक सवाल आहे. नकारात्मक सूर गुंजारीत प्रश्नांची सरबत्ती जरी मांडली असली तरी मी आणि माझ्यासारखे असंख्य लोक युवापिढीप्रती प्रचंड आशावादी आहेत. कारण आम्ही त्यांच्यातील उत्साह व प्रश्नांना भिडण्याची ताकत अनुभवलेली आहे. आधुनिक युगात माणसातील जगण्याच्या व वागण्याच्या पद्धतींमध्ये वेगाने परिवर्तन होत आहे. पूर्वी नव्हत्या तितक्या अधिक व भिन्न प्रकारच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.त्यांच्याशी लढण्यासाठी युवापिढीने तयार असले पाहिजे. तरुणांमध्ये आत्मभान व स्वतः सोबतच इतरांच्या सुख-दुःखाची जाण निर्माण झाल्यास विश्व अजुनी सुंदर होवू शकते. त्यांच्यात कधी-कधी मानसिक निराशेतून पोकळी निर्माण होते. भविष्य अंधकारमय असल्याचा साक्षात्कार होतो आणि मग आपण ऐकतो, पाहतो अथवा वाचतो अमुक-तमुकने परीक्षेतील अपयशामुळे, प्रेमभंगामुळे, बेरोजगारीमुळे, आजारपणामुळे, कौटुंबिक कलहामुळे स्वत:ला संपविले. आपल्या दुर्लभ जीवनाचा व निसर्ग शक्तींमुळे सुंदर असलेल्या या विश्वाचा त्याग कोणी कसा बर करू शकतो? त्यांच्यातील संकटांशी लढण्याची अदम्य इच्छाशक्ती कुठे लुप्त होत असते.जगात अशी अनेक उदाहरणे आहेत त्यांनी संकटांशी दोन हात केलेत. प्रत्येक येणारा क्षण यशाचाच असतो असे नाही हे गमक त्यांना उमगले होते. जो चैतन्यमय आणि चिवट आहे तो तरुण स्वतः तरून जावू शकतो व इतरांना सुद्धा तारू शकतो. त्यासाठी आशावाद आपल्या आत साठवून ठेवावा लागतो एखाद्या शिदोरीसारखा. खानदेशी तरुण गझलकार धीरज नवलखे आपल्याला सांगतो..... हारूनी पाहूया, जिंकुनी पाहुया || जीवनाशी जरा खेळुनी पाहुया || लाख काट्यातुनी वाट ही चालली... राहु दे चल तरी, चालुनी पाहुया || चहुबाजूला पसरलेली अनास्था, माणसा-माणसातील अविश्वास आणि सामाजिक मत प्रवाहांच्या प्रचंड गोंधळामुळे आपल्या चैतन्याची धारा मंद झाल्याची पुसटशी कल्पना आली तर तरुणातील तरुणाई प्रचंड आत्मविश्वासाने समाजाचे - देशाचे चित्र पालटू शकते.